मुंबई मेट्रो महामंडळाची स्थापना; अनेक प्रकल्पांना गती

मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) झपाटय़ाने होणारी वाढ नियोजित पद्धतीने व्हावी, यासाठी पालघर जिल्ह्य़ातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांतील ४३३ गावांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समावेश करण्यास बुधवारी मंजुरी मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत हा निर्णय झाला. त्याचबरोबर ठाण्यातील गायमुख ते मीरा रोडमधील शिवाजी चौक, वडाळा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण ते नवी मुंबईतील तळोजा दरम्यानच्या १८ हजार ७०० कोटी रुपये खर्चाच्या तीन नव्या मेट्रो मार्गानाही यावेळी मान्यता देण्यात आली. त्यामुळे महानगर प्रदेशात २७५ किमी लांबीचे मेट्रो मार्गाचे वर्तुळ पूर्ण होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. कल्याण-तळोजा मेट्रो १२ची सुसाध्यता पुन्हा तपासण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणास केली.

मुंबई आणि परिसरात मेट्रोचे जाळे पसरत असून एमएमआरडीएतर्फे २७६ किमी लांबीच्या १२ मेट्रो मार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ कुलाबा- वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचे काम मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन करीत आहे. नवी मुंबईत सिडकोतर्फे मेट्रोचे काम होणार आहे. पुढील वर्षी अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्गिका -७ आणि दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गिका २-अ सुरू होणार आहे. वर्सोवा- घाटकोपर ही मेट्रो-१ रिलायन्स कंपनीतर्फे चालविली जात आहे.

हद्दवाढीमुळे एमएमआरडीएचे पूर्वी असलेले ४२५४ चौरस किमी. क्षेत्र वाढून आता ते ६२७२ चौरस कि.मी. इतके होणार आहे. त्यात ४३३ नवीन गावांचा समावेश करण्यात आला असून बोईसर, पेण आणि विरार येथे विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.

विविध योजना- प्रकल्पांच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ‘वॉर रूम’च्या धर्तीवर प्राधिकरणानेही ‘वॉर रूम अँड इनोव्हेशन सेंटर’ची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच एमएमआरडीएच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरणही फडणवीस यांनी केले.

या बैठकीत ‘जागतिक व्यापार सेवा केंद्र’ (आय.एफ.एस.सी) आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग वांद्रे-कुर्ला स्थानकाशी जोडण्याचा निर्णयही प्राधिकरणाने घेतला.

मुंबई मेट्रो महामंडळ स्थापन

सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो मार्गाच्या एकत्रीकरण आणि एकत्रित संचालनासाठी मुंबई मेट्रो महामंडळ स्थापण्याचा निर्णय या बैठकीत झाला. मेट्रोसोबतच मोनो रेलचेही संचालन आणि व्यवस्थापनही हेच मंडळ करील. त्यासाठी सुमारे १००० पदे निर्माण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

* गायमुख ते मीरा रोड मेट्रो-१०

लांबी : ११.४ किमी. ल्ल खर्च : ४४७६ कोटी रुपये.

स्थानके : गायमुख, वर्सोवा चारफाटा, काशिमीरा आणि शिवाजी चौक (मीरा रोड).

* वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-११

लांबी : १४ किमी. ल्ल खर्च : ८७३९ कोटी रुपये.

स्थानके : वडाळा आरटीओ, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी मेट्रो, हे बंदर, कोल बंदर, दारूखाना, वाडी बंदर, क्लॉक टॉवर, कर्नाक बंदर आणि सीएसएमटी.

* कल्याण-तळोजा मेट्रो-१२

लांबी : २५ किमी. * खर्च : ४१३२ कोटी रुपये. * स्थानके : १७.