मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला.
मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र या मार्गावरील कोपरी येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ निमुळता रस्ता असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पाश्र्वभूमीवर  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती.
या बैठकीमध्ये कोपरी रेल्वे उड्डाण पुलाचे रुंदीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करता येऊ शकते, असे चर्चेदरम्यान स्पष्ट होताच शिंदे यांनी यूपीएस मदान यांच्याशी चर्चा केली. तसेच ठाणेकरांची अडचण समजावून सांगत त्यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे रुंदीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याची मागणी केली. त्यास मदान यांनी तात्काळ मान्यता दिल्याने या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचबरोबर भास्कर कॉलनीसाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून एक सब-वेही काढण्यात येणार आहे. त्यामुळे तीन हात नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा मुंबईकडे जाण्याचा वेळ वाचणार आहे.
कॅडबरी कंपनी येथील उड्डाणपुलावरून पोखरण १ ला जाण्यासाठी एक मार्गिका केल्यास ठाणेकरांना सोयीचे होईल. असेही या बैठकीत निष्पन्न झाले असून ही मार्गिका करण्याचेही या बैठकीत प्रस्तावित करण्यात आले.