महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील नाणार प्रकल्पाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. ताडदेवमधील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय मनसे कामगार सेनेने फोडलं आहे. ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर हा हल्ला करण्यात आला. राज ठाकरेंच्या मुलुंडमधील सभेतील इशाऱ्यानंतर नाणार प्रकल्पावरुन मनसे आक्रमक झाली असल्याचं पहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी बोलताना कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, अशा इशारा सरकारला दिला होता. काही दिवसांपूर्वी रिफायनरी प्रकल्प होऊ नये यासाठी नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

[jwplayer I9AgN7qf]

‘नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

मनसेच्या वतीन मुलुंड येथे एका शानदार सोहळ्यात १०० महिलांना रिक्षांचे वाटप करण्यात आले. महिलांना सक्षम करण्यासाठी मनसेने हे पाऊल उचलले असून राज यांच्याहस्ते महिलांना रिक्षांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी झालेल्या सभेत राज बोलत होते.