केंद्र सरकारच्या प्रस्तावित आदर्श भाडेकरू कायद्याच्या मसुद्यात बाजारभावाने भाडे आकारण्याचे नमूद असले तरी तसे होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी या भाडेकरू कायद्याला विरोध करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरविले आहे. प्रस्तावित भाडेकरू कायद्यात बाजारभावाने भाडे आकारण्याचे नमूद करणे योग्य नसल्याचे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे. हा प्रस्तावित कायदा म्हणजे मालक आणि भाडेकरू यांच्यात नवा अध्याय सुरू होणार नसून गरीब व मराठी भाडेकरूंना बेघर करण्याचा हा डाव आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी निदर्शने केली.