गेल्या दीड वर्षापासून देशभरात करोना ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर करोनाचं सावट असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी तर सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळे सगळ्यांची निराशा झाली होती. गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे.

अभिजित पानसेंची फेसबुक पोस्ट!

मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. बुधवारी दुपारी त्यांनी ही पोस्ट केली असून त्यामध्ये “विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. करोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्र असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

गेल्या वर्षी करोनामुळे दहीहंडी झाली होती रद्द

दरवर्षी मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये मोठ्या संख्येनं गोविंदा पथकं सहभाग घेत असतात. अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते देखील मोठमोठ्या दहीहंडींचं आयोजन करत असतात. त्यामुळे दहीहंडीच्या या पारंपरिक उत्सवामध्ये आर्थिक उलाढाल देखील मोठी होत असते. मात्र, गेल्या वर्षी करोनामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या वर्षी देखील तशाच प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता असताना त्याआधीच मनसेकडून अशा प्रकारे विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.