लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांची राज्यात पुन्हा दबंगगिरी सुरू झाली असून नवी मुंबईत अशा प्रकारे दादागिरी करणाऱ्या आठ मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकविला. नवी मुंबईतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे येणार आहेत. याचे भांडवल करून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमासाठी वसुलीदेखील केली जात असल्याचे समजते.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होईल त्या ठिकाणी (बेलापूर) उमेदवार उभा करण्यात आला आणि ऐरोली मतदार संघातील उमेदवाराला घरी बसविण्यात आले. अलीकडे नव्याने या पक्षाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून गजानन काळे या तरुणाकडे ही धुरा सोपविण्यात आली आहे. त्याच्या वतीने वाशी येथे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी ठाकरे यांच्या स्वागताचे संपूर्ण नवी मुंबईत फलक लावण्याच्या नादात कार्यकर्त्यांनी नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या बस स्थानकांवरदेखील लावले. हे स्थानक श्री अ‍ॅड नावाच्या जाहिरात कंपनीने वार्षिक भाडय़ाने घेतलेले आहे. त्यामुळे ज्या जाहिराती या स्थानकांवर लावण्यात आल्या होत्या, त्या कंपनींनी मंगळवारी श्री अ‍ॅडकडे तक्रार केली. त्यामुळे श्री अ‍ॅड कंपनीने स्थानकांवर लावलेले फलक उतरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी श्री अ‍ॅडच्या वाशी सेक्टर १७ मधील कार्यालयाची मोडतोड केली. त्यामुळे गजानन काळे, संदीप गलगुडे, विनय कांबळे, हरजितसिंग संधू, कैलाश म्हात्रे, अतिष पाटील, हरजितपाल सिंग या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.