महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा  करण्यात आला.  मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी  यावेळी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.  तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार असून, मनसेचे जे खासदार निवडून येतील ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केली.
यावेळी मनसेचे सर्व आमदार व राज्यभरातून कार्यकर्ते याठिकाणी जमले होते. ‘एम एन एस अधिकृत’ या नावाने मनसेच्या अधिकृत अॅपचे उदघाटन राज ठाकरेंच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले. तसेच, शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी मनसेत प्रवेश केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले की, गारपीटीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित सर्व पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. आज येथे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. मात्र, शेतकरी गारपीटीमुळे नुकसान सहन करत असताना आपण कार्यक्रमाचा आनंद योग्य दिसत नाही. लोकसभा निवडणूकांबाबत बोलताना राज म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविणार न लढविणार अशी आतापर्यंत अनेकांची चर्चा सुरू होती. आज मी मनसे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करतो. या निवडणुकीत आमती काय ताकद आहे, ते आम्ही सर्वांना दाखवून देणार आहे. मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत अूसन, येत्या दोन ते तीन दिवसांत पुढील यादी जाहीर करण्यात येईल. लवकरच पहिल्या सभेची तारीखही जाहीर करणार आहे. आपण सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. मला खात्री आहे, की आपले खासदार निवडून येतील. निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. देशाच्या भविष्यासाठी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे, मला वाटते.”
‘मनसे’ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी.
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर
उत्तर पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण – राजीव पाटील
शिरूर – अशोक खांडेभराड
नाशिक – डॉ. प्रदीप पवार
पुणे – दिपक पायगुडे