२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकत मोठया प्रमाणात घटली आहे. तेरावरुन एक आमदार आणि मुंबई महापालिकेत एक नगरसेवक अशी मनसेची घसरण झाली आहे. मागच्या काहीवर्षात अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली. पण असे असूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. १४ जून रोजी राज ठाकरेंनी वयाच्या पन्नाशीमध्ये पदार्पण केले असून या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.

खासगी आयुष्य 

– राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे असून त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला.

– राज ठाकरे यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले.

– व्यंगचित्रांबरोबर राज ठाकरेंना तबला, गिटार आणि व्हायोलिनही वाजवता येते. बालपणी त्यांनी ही वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले.

– राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

– राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मिनाताई ठाकरे या सुद्धा सख्ख्या बहिणी आहेत.

– राज ठाकरे यांचा शर्मिला ठाकरेंबरोबर विवाह झाला. त्या प्रसिद्ध नाटय निर्माते मोहन वाघ यांच्या कन्या आहेत.

– राज व शर्मिला ठाकरे यांना दोन मुले आहेत. अमित आणि उर्वशी. उर्वशी या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करीयर करत आहेत.

– राज ठाकरे यांच्या मुलाचा अमितचा साखरपुडा झाला असून त्यांच्या होणाऱ्या सूनबाई मिताली बोरुडे या सुद्धा फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत.

– व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे.

– राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे.

राजकीय परिचय

– राज ठाकरे आज राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे काढली.

– आजही राज ठाकरे यांची नियमित व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असून सध्या भाजपाने त्यांच्या व्यंगचित्रांचा धसका घेतला आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत आहेत.

– राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.

– २००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.

– २००८ मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले.

– २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तेरा आमदार निवडून आले.