महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रातूनही राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान धादांत खोटे बोलतात, अशी टीका राज ठाकरे यांनी शनिवारी केली होती. त्या टीकेला धरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढत मोदींना पुन्हा लक्ष्य केले. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्राला ‘एकाच मातीतील दोघे,’ असे शीर्षक दिले आहे.

राज ठाकरेंनी गांधी जयंतीनिमित्त रेखाटलेल्या छायाचित्रात महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत. यामध्ये गांधींच्या हातात ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या हातातही राज ठाकरेंनी एक पुस्तक दिले आहे. राज ठाकरेंनी या पुस्तकाला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी धादांत खोटे बोलतात. इतक्या मोठ्या प्रमाणात खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही,’ अशी टीका राज यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या हातात राज यांनी ‘माझे असत्याचे प्रयोग’ हे पुस्तक दिले आहे. मोदी खोटे बोलतात. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिल्यास त्याचे नाव ‘माझे असत्याचे प्रयोग’ असेल, असे राज यांना सुचवायचे आहे.

पंतप्रधान मोदींवरील व्यंगचित्राला राज ठाकरेंनी ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक दिले आहे. महात्मा गांधी आणि मोदी हे एकाच मातीतील, म्हणजेच गुजरातमधील आहेत. मात्र या दोघांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. महात्मा गांधी कायम खरे बोलायचे. त्यामुळेच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधींच्याच मातीमधील, म्हणजेच गुजरातमधील मोदींनी त्यांचे आत्मचरित्र लिहिल्यास त्याला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव द्यावे लागेल, असे राज यांनी व्यंगचित्रातून सुचवले आहे.