महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपाला टोला लगावला असून २०१४ तील निवडणुकीचे जुमले २०१९ मध्ये चालणार नसून मोदी लाट ओसरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी व्यंगचित्राला दिल्लीच्या ड्रेसिंगरूममधील चर्चा असे शीर्षक दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह एकमेकांबरोबर त्रासिक मुद्रेत चर्चा करत असल्याचे दाखवले आहे. अमित शाह यांच्या हातात क्रिकेटमधला चेंडू असून त्यावर २०१४ चे जुमले असे लिहिलेले आहे. अमित शाह मोदींना म्हणतायत, गोतमभाईला सांगून ओस्ट्रेलियासून पोलिसपेपर मांगवून घासून पायला, पन हे बोल पुना २०१९ मदी स्विंग होएलसं वाटात नाय !, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली आहे.
चेंडू स्विंग होऊन विकेट मिळावेत यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडुंनी चेंडूत छेडछाड केली होती. पण विकेट राहिल्या लांब या खेळाडुंना संघातून निलंबनाची शिक्षा मिळाली. तोच संदर्भ देत राज यांनी भाजपाला आपल्या कुंचल्याने फटकारले आहे. भाजपाने २०१४ मध्ये ‘चुनावी जुमले’ जुमले करून निवडणूक जिंकली. पण तेच जुमले पुढील वर्षीच्या निवडणुकीत कामी येणार नसल्याचे व्यंगचित्रातून सांगितले आहे.
२०१९ मध्ये भाजपाने काहीही केलं तरी त्यांची सत्ता काही येणार नाही, असेच राज यांनी सूचित केले आहे. कुठलाही पॉलिश पेपर आणला तरी मोदी लाट चालणार नसल्याचे राज यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 31, 2018 7:09 pm