मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर भाष्य करताना आजारी साखर कारखाने आणि त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करणाऱ्या राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यंदा पुरेशा पावसाअभावी नोव्हेंबरपासूनच महाराष्ट्रात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अशावेळी तहानलेल्या महाराष्ट्राला मदत करण्याऐवजी सरकार आजारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत देत असल्याच्या वृत्ताचा दाखला देत राज यांनी साखर सम्राट आणि फडणवीस सरकारला आपल्या कुंचल्यांनी फटकारले आहे.

राज यांनी आपल्या व्यंगचित्रात एक तहानलेला मरणासन्न व्यक्ती पाण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यावर ओरडत असून कोपऱ्यात जाऊन बसण्याच्या सूचना करत आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांनी संवेदनशील सरकार अशी उपमा दिली आहे. ‘वा.. जा बघू, तिथे कोपऱ्यात जाऊन बस ! सारखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या ! याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही !,’ असा साखर कारखान्यांकडे इशारा करत म्हणताना व्यंगचित्रात दिसतात.

राज यांनी आपल्या व्यंगचित्रात आजारी साखर कारखाने म्हणून एका व्यक्तीला दाखवले असून त्याच्यासमोर नोटांचे ढिगारे लागल्याचे दिसतात. हा व्यक्ती हाताची घडी घालून पैशांकडे निश्चिंतपणे पाहत असल्याचे दिसते  ‘महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना येथील आजारी साखर कारखान्यांना ५५० कोटी रुपयांची मदत करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे! – बातमी’, असा उल्लेख त्यांनी आपल्या व्यंगचित्रात केला आहे.

मागील आठवड्यातही राज ठाकरे यांनी दररोज एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.