मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे ‘लक्ष्मीपूजना’चा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी मोदी-शहा जोडगोळीला लक्ष्य केले आहे. दुपारी अडीचच्या सुमारास राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रावर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रात ‘लक्ष्मी’ देवी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे पूजन करुन समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. भरभराटीसाठी लक्ष्मी प्रसन्न व्हावी, असा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मी देवीच मोदी आणि शहांकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे. समोर उभ्या असलेल्या मोदी आणि शहांकडे ‘देश चालवायला मला थोडे पैसे देता का?,’ अशी विचारणा लक्ष्मीकडून केली जात आहे.

भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच चर्चेत होते. इलेक्शन वॉच या संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या १० वर्षांमध्ये भाजपच्या संपत्तीमध्ये तब्बल ६२५ टक्के इतकी वाढ झाली आहे. २००४-०५ मध्ये भाजपकडे १२२.९३ कोटी रूपयांची संपत्ती होती. २०१५-१६ मध्ये हा आकडा ८९३.८८ कोटींवर जाऊन पोहोचला. त्यामुळे भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी त्यांच्या फटाकाऱ्यांमधून भाजपला ‘फटकारले’ आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित शहांचे पुत्र जय शहांच्या भरभराटीचीही मोठी चर्चा आहे. जय शहांच्या ‘टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची उलाढाल वर्षभरात तब्बल १६ हजार पटींनी वाढली आहे. विशेष म्हणजे ‘टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ने स्वत:हूनच ही माहिती कंपनी नोंदणी कार्यालयाला दिली आहे. जय शहांच्या या अचानक झालेल्या भरभराटीवरुन काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यामुळेच अमित शहांच्या मुलाची भरभराट आणि भाजपची श्रीमंती यांच्यावरुन राज ठाकरेंनी ‘लक्ष्मीपूजना’चे विशेष व्यंगचित्र रेखाटले आहे.