कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून ठाणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे. याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरुवातीला ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांनादेखील याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून सोमवारी ईडीकडून पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आज मंगळवारी राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. उन्मेष जोशीदेखील ईडी कार्यालयात हजर असून राजन शिरोडकर आणि त्यांची एकत्र चौकशी केली जात आहे. ‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस’ने (आयएल अॅण्ड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनसैनिकाची आत्महत्या
कळव्यातील मनसैनिक प्रविण चौगुले याने मंगळवारी रात्री आत्महत्या केली. राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जातो. परंतु त्याला दारूचे व्यसन होते आणि यापूर्वीही त्याने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

राज ठाकरेंकडून शांततेचं आवाहन
राज ठाकरे यांनी कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे. केसेस आणि नोटीसांची मला सवय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणी कितीही डिवचायचा प्रयत्न झाला तरी शांतता राखा असा स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिला आहे.