विविध सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून शिवसेनेविरोधात भूमिका मांडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी सकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याची माहिती मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे दुपारचे भोजन केले. तसेच विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. सुमारे सव्वातास राज ठाकरे ‘मातोश्री’वर होते. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते.
एकीकडे शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमधील वाद दिवसेंदिवस वाढत असताना येत्या काही महिन्यात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन भेट घेण्याला आणखी महत्त्व आले आहे.
गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका मांडली होती. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी फक्त शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मनसेचे उमेदवार उभे केले होते. त्याचबरोबर जाहीर सभांमधून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. मुंबई मेट्रो प्रकल्पाची कारशेड, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक या वेळीही राज ठाकरे यांनी शिवसेनेला फटकारले होते.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच राजकीय पक्षांकडून सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्यात येते आहे.
काही महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी राजचे भाषण सुरू असतानाच उद्धव कार्यक्रमस्थळी आले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी भाषण थांबवून, आले आमचे बंधू राज अशी कोपरखळी मारली होती. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आल्यानंतर हस्तांदोलन करून राज ठाकरे यांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली होती.
वाचा राज ठाकरे यांनी शिवसेनेवर कशी तोफ डागली होती…
उद्धव ठाकरे यांना जुलै २०१२ मध्ये छातीत दुखू लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे आपला दौरा रद्द करून मुंबईकडे धाव घेतली होती. राज यांनी लीलावतीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर रुग्णालयातून उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाल्यावर राज ठाकरे यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’वर नेले होते.