हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने दोन दिवसांपूर्वीच घेतला. हाच मुद्दा उचलून धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढले आहे. राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रकाशितही करण्यात आले आहे. ‘(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधते आहे असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे भारतीय हज यात्रेकरू उभे आहेत असेही दाखवण्यात आले आहे. तसेच भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे, ते अनुदान काढून घेतलेत ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या.  त्याचप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानातील घुसखोर यांनाही हाकलून द्या असेही भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे. तर या घुसखोरांच्या मागे ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्याच्या मुद्द्यावरून हे व्यंगचित्र काढले आहे. तसेच पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले पाहिजे अशीही भूमिका व्यंगचित्रातून घेतली आहे.

जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे श्रद्धास्थान असून भारतातील हजारो मुस्लीम या यात्रेसाठी जातात. केंद्र सरकारच्या हज धोरणाचा मसुदा ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आला होता. अफजल अमनुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या समितीने मसुदा तयार केला होता. या समितीनेही हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याची शिफारस केली होती.

हे अनुदान बंद झाल्यानंतर काशी, अयोध्या, मानसरोवर यात्रांचेही अनुदान बंद करणार का? असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला होता. आता या निर्णयानंतर दोन दिवसांनी राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर बांगलादेशी आणि पाक घुसखोरांना हाकलून द्यावे अशीही रोखठोक भूमिका घेतली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackerays cartoon on the decision to haj subsidy
First published on: 19-01-2018 at 22:59 IST