खडसे वादात मनसेचा सवाल
वादग्रस्त निर्णयांमुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई कराच, परंतु विरोधी पक्षात असताना जमीन घोटाळ्यांची काढलेली ११३ प्रकरणे, कृपाशंकर सिंग यांचा कोटय़वधींचा भ्रष्टाचार तसेच ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी बैलगाडीभर पुरावे मांडण्यात आघाडीवर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या घोटाळ्यांबाबत गप्प का, असा सवाल मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठय़ा घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच खडसे यांची प्रकरणे बाहेर काढली जात असावी असा संशयही नांदगावकर यांनी व्यक्त केला. भाजपमधील नेत्यांनी आपसातील हिशेब जरूर चुकते करावेत. त्यासाठी खडसे यांची चौकशी करा वा त्यांना निलंबित करा,ु सत्तेवर येण्यापूर्वी ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशा घोषणेचे काय झाले, असा सवाल नांदगावकर यांनी केला.

खडसेंविरोधात कृती करा; काँग्रेसची मोदींकडे मागणी
नवी दिल्ली: एकनाथ खडसे यांच्याबाबत निर्णायक कृती करा अशी मागणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. भ्रष्टाचाराबाबत दयामाया दाखवणार नाही हा आपला दावा कृतीत आणावा, अशी सूचना काँग्रसचे माध्यमप्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी केली
आहे.
याबाबत पंतप्रधानांनी मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपच्या मंत्र्यांविरोधात आरोप होत असताना पंतप्रधान गप्प कसे? पंतप्रधानांनी ठोस कृती करावी अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा असल्याचे सूरजेवाला यांनी सांगितले.