टीकेनंतर मनसेचा चिमटा
कोणी पिस्तूलमधून माझ्यावर गोळ्या झाडल्या नाही तर वयाची १०० वर्षे पूर्ण करीन, असे मनसेला प्रत्युत्तर दिलेल्या रा. स्व. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वय आता औषधांच्या गोळ्या घेण्याचे आहे, असा चिमटा मनसेने रविवारी काढला आहे.
महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या वैद्य यांचे पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याचे दिवस आले आहेत, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात खिल्ली उडविली होती. यावर कोणी गोळ्या झाडल्या नाहीत तर वयाची शंभरी पूर्ण करेन, असे सांगत वैद्य यांनी मनसेवर निशाणा साधला होता. ५० लाख ते तीन कोटींपर्यंतच्या लोकसंख्येसाठी राज्य स्थापन करावे, असे मत वैद्य यांनी शनिवारी मांडले आहे. एवढी छोटी राज्ये स्थापन करून भारतीय संघराज्याऐवजी महानगरपालिकांचे संघराज्य स्थापन करायचे आहे का, असा सवाल मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी वैद्य यांना केला आहे. देश मोठा आहे म्हणून लोकांच्या सोयीसाठी तो छोटा करा, असे वैद्य म्हणतील का, असा सवालही मनसेने केला आहे.