मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप करुन त्यांची नावे जाहीर करण्यात मौन बाळगणाऱ्या विनोदी कलाकार कपिल शर्माविरोधात मनसेने सोमवारी तक्रार दाखल केली. मनसे कार्यकर्ते संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात कपिल विरोधात तक्रार दाखल केली असून आरोप करुन भष्टाचाऱ्यांची नावे उघड न केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामूळे आता ट्विटरवची टिवटिव कपिलला पोलिसांत हजेरी लावण्याचे संकेत मिळत आहेत. कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितल्याचे ट्विट केले होते. हे ट्विट कपिलने थेट नरेंद्र मोदींना टॅग करत हेच का तुमचे ‘अच्छे दिन’ असा सवालही उपस्थित केला होता.

कपिलने ट्विटरवरुन मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने कपिलला आरोप सिद्ध करावे, अशी भूमिका घेतली. कपिलने आरोप सिद्ध न केल्यास मनसे शैली दाखवू, असे भाष्य करत त्याचे शो बंद पाडण्याची धमकी वजा सूचना देखील मनसेने कपिलला दिली होती. आपल्या टिवटिवमुळे राजकारण सुरु झाल्याचे लक्षात येताच कपिल शर्माने माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही. मी फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला होता अशी सारवासारव केली.

वर्सोवा पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी अंधेरी पश्चिम येथील तहसिलदारांची भेट घेऊन बंगल्याच्या परिसरातील तिवरांच्या झाडांची कत्तल करणा-या कपिल शर्मावर अनधिकृत भरणी-बांधकाम व तिवरांच्या तोडणीबाबत अनधिकृत गौणखनिज भराव अंतर्गत म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व (८) नुसार दंडात्मक व कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ही माहिती आपल्या फेसबुकपेजवरुन शेअर केली आहे.

सोमवारी भाजप आमदार राम कदम यांनी देखील कपिलच्या घरासमोर आंदोलन केले. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही कपिल शर्मासोबत आहोत, कपिलने आरोप केलेत, आता पैसे मागणा-या अधिका-यांची नावही जाहीर करावीत अशी मागणी करत राम कदम यांनी कपिलच्या घराबाहेर ठीय्या मांडला होता.