तौते चक्रीवादळाचा मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला जोगदार तडाखा बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीवरून विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यानी मोतोश्रीच्या बाहेर पडून राज्यात फिरून करोना परिस्थिचा आढावा घ्यावा, अशी टीका देखील विरोधक करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”

संदीप देशपांडे सतत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधत असतात. त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत देखील या दोघांवर टीका केली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील,” अशी फिरकी देशपांडे यांनी घेतली.

यापुर्वी, संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राज्यसरकाला जाब विचारला होता. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे. त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,” असं देशपांडे यांनी म्हटलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप

देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत केंद्राने जाहीर केली आहे. तसेच गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.