परळ येथील प्रसिद्ध केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने याआधी सुद्धा केईएम रुग्णालयाला आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. आज आनंदीबाई जोशी यांच्या १५३ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करताना मनसेने पुन्हा एकदा महापालिकेला या मागणीचे स्मरण करुन दिले आहे.

मनसेने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन टि्वट करताना महापालिका आणि महपौर विश्वानाथ महाडेश्वर यांना टॅग केले आहे. केईएमचे पूर्ण नाव किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय असून ब्रिटिश काळापासून उभ्या असलेल्या या रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात.

अठराव्या शतकात शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आनंदीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. आणि त्यांना आज गुगलने ३१ मार्च रोजी त्याच्या जन्म दिवसाचे निमित्त साधुन मानवंदना दिली आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा हक्कच नव्हता. त्या काळात सामाजिक व कौटुंबिक विरोधावर मात करत अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रगतीच्या दिशेने उचललेले एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे आनंदीबाई होय.

त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात एका सधन कुटुंबात झाला होता. परंतु तत्कालीन रुढी परंपरानुसार वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा तब्बल २० वर्ष मोठ्या गोपाळराव जोशी यांच्याशी करण्यात आला. स्वत: शिक्षित असल्यामुळे गोपाळराव अठराव्या शतकातील भारतीय विचारधारेपेक्षा बरेच पुढारलेले होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. पुढे प्राथमिक शिक्षण सुरु असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला.

दरम्यान त्यांचे शिक्षण काहीसे बारगळले. परंतु वैद्यकिय सुविधांच्या अभावामुळे त्यांचे ते मुल काही जगू शकले नाही. आणि या घटनेचा गोपाळरावांच्या मनावर पार खोलवर परिणाम झाला. आणि अशी वेळ इतर दुसऱ्या कोणावर येऊ नये यासाठी आनंदीबाईंनाच तंत्रशुद्ध वैद्यकिय शिक्षण देण्याचा निर्णय गोपाळरावांनी घेतला.

पुढे ४ जून १८८३ साली आनंदीबाई उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पोहोचल्या. परदेशात जाउन शिक्षण घेणाऱ्या भारतीय इतिहासातील पहिल्या महिला होण्याचा मान यामुळे आनंदीबाईंना मिळाला.