राज्यात मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाईम’ मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटांना वगळून गुजराती आणि अन्य प्रादेशिक चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये ‘प्राइम टाइम’ मिळत असल्याने संतप्त होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(मनसे) पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्याक’ भूमिका घेतली आहे.

नक्की वाचा:- आशियाई चित्रपट महोत्सवात ‘परतु’ ची बाजी

बोरिवलीच्या सोना चित्रपटगृहात ‘गुज्जूभाई द ग्रेट’ या गुजराती चित्रपटाला प्राइम टाईम देण्यात आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली. त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे.
सोना थिएटरमध्ये प्राइम टाईममध्ये ‘गुज्जूभाई दि ग्रेट’ या चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता आणि मराठी चित्रपटाचा एकही शो प्राइम टाइममध्ये नव्हता. हे समजताच मनसे कार्यकर्त्यांनी त्या विरोधात निदर्शने करत मराठी चित्रपटाना प्राईम टाईम मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली.

तसेच राज्यातील मल्टिप्लेक्सनी ‘प्राइम टाईम’मध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केलेले असतानाही, अनेक मल्टिप्लेक्समध्ये हा नियम डावलून प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
राज्यात जिथे- जिथे प्राइम टाईमला गुजराती व अन्य प्रादेशिक चित्रपट दाखवले जात असतील त्या थिएटर्सविरोधात आम्ही आंदोलन करू आणि जे थिएटरमालक आम्हाला विरोध करतील त्यांना मनसे स्टाईल दणका दाखवू, असा इशारा देखील मनसेतर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी दुष्काळग्रस्तांना मदत न केल्यास हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकू असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेने दिला होता. गेली अनेक वर्षे बॉलीवूडमधील कलाकार महाराष्ट्रात व्यवसाय करत आहेत.

येथील जनतेच्या जीवावर बॉलीवूडकरांनी आजपर्यंत पैसा कमावला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या तावडीत सापडला असताना त्यांना मदत करणे हे बॉलीवूडकरांचे कर्तव्य आहे, असे मत मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मांडले होते.