News Flash

‘मनसे’ने सांगलीत कमावले, पुण्यात गमावले!

पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिकेच्या पोटनिवडणुकीतच पराभूत करून काँग्रेसने जोरदार झटका दिला. या पराभवामुळे मनसेला महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे

| July 10, 2013 03:58 am

पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिकेच्या पोटनिवडणुकीतच पराभूत करून काँग्रेसने जोरदार झटका दिला. या पराभवामुळे मनसेला महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले असून आगामी चार वर्षांसाठी काँग्रेसच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली आहे. एकीकडे सांगलीत फारसा जम बसविलेला नसताना तेथे मनसेने खाते उघडले तर ज्या पुण्यात ताकद निर्माण केली तेथे विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४० ची पोटनिवडणूक मनसे व काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची असताना तिकीट वाटपापासून ‘मनसे’ गोंधळ घातला गेला. या निवडणुकीतील विजयावर विरोधी पक्षनेतेपद निश्चित असताना मनसेच्या नेत्यांनी ही निवडणूक उंटावरून शेळ्या हाकण्यासारखी लढविल्यामुळे त्यांना पराभवाचा फटका बसला. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी घोडके यांनी मनसेच्या इंदुमती फुलावरे यांचा ४४९ मतांनी पराभव केला.
हा पराभव मनसेतील अंतर्गत लाथाळ्या उघड करणारा असून लोकसभा निवडणुकीत पुण्यात मनसेपुढे काय वाढून ठेवले त्याचे चित्र मांडणारा आहे. मनसेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचा जातीचा दाखला व प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे मनसेची सदस्य संख्या २९ वरून २८ वर आली आणि विरोधी पक्षनेतेपदाची माळ काँग्रेसच्या गळ्यात २८ नगरसेवक असूनही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे पडली होती. पोटनिवडणुकीत मनसेचा उमेदवार विजयी झाला असता तर विरोधी पक्षनेतेपद पुन्हा मनसेकडे आले असते. मनसेतील पेशवाई कारभारामुळे निवडणूक प्रतिष्ठेची करूनही पराभव झाला.
तिकीट वाटपात मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांला डावलून ‘आयात’ उमेदवार लादल्यामुळे तसेच पक्षाचे पुण्याचे कारभारी शेवटपर्यंत उंटावरूनच निवडणूक प्रचाराच्या ‘शेळ्या’ हाकत असल्याने मनसेला पराभवाचा झटका बसल्याचे पुण्यातील मनसेच्या काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत घोडके यांना चार हजार ३४२ मते मिळाली तर मनसेच्या फुलावरे यांना ३८९३ मते मिळाली. भाजपच्या संध्या बरके यांना १२१६ तर राष्ट्रवादीच्या निलम लालबिगे यांना ७६७ मते मिळाली. सांगली महापालिकेच्या निवडणूक ही काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील लढत होती. तेथे मनसेची काहीही स्थान नसतानाही मनसेने खाते उघडले. मात्र पुण्यातील मनसेच्या किल्लेदारांनीच दुर्लक्ष केल्यामुळे मनसेला पराभव पत्करावा लागून विरोधी पक्षनेतेपद गमाविण्याची वेळ आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 3:58 am

Web Title: mns earn in sangli lost in pune
Next Stories
1 एमएमआरडीएचे काम मिळविणाऱ्या रामकीविरोधात शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे धाव
2 लखनभैय्याला मारून चूक केली नाही!
3 पहिल्या प्रवेश फेरीनंतर आयआयटीच्या ७६९ जागा रिक्त
Just Now!
X