पक्षादेश धुडकावून काँग्रेसला मतदान केल्याबद्दल कारवाई
प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश धुडकावून काँग्रेसला मतदान करणाऱ्या मनसेच्या दोन नगरसेविकांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी केली. या दोन्ही नगरसेविकांचे पक्षाचे प्रथमिक सदस्यत्व आणि नगरसेवक पद निलंबित करण्यात आले असून त्याबाबतचे पक्ष कोकण भवन येथील विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेविका गीता चव्हाण आणि सुखदा पवार यांनी पक्षादेश धुडकावून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे मनसेमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज ठाकरे यांनी गीता चव्हाण आणि सुखदा पवार यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी केली.
मनसेने यापूर्वी गीता चव्हाण यांनी प्रभाग समितीचे अध्यक्षपदही बहाल केले होते. गेल्या काही महिन्यांपासून गीता चव्हाण यांनी शिवसेनेशी जवळीक साधली होती. याची कुणकूण मनसेच्या नेत्यांनाही लागली होती. एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या अलिकडेच झालेल्या निवडणुकीत गीता चव्हाण यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. त्यांना सुखदा पवार यांनी साथ दिल्यामुळे मनसेच्या नगरसेवकांना धक्का बसला होता. पक्षादेश धुडकावणे, पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाची शिस्त मोडल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज ठाकरे यांनी या दोघांनी पक्षाच्या बाहेरची वाट दाखविली. पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार गीता चव्हाण आणि सुखदा पवार या दोघींचे मनसेचे प्राथमिक सदस्यत्व आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक पद १६ एप्रिल २०१६ पासून निलंबित करण्यात येत आहे. महापालिका पक्षांतरबंदी अनर्हता कायद्यानुसार या दोघींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी विभागीय आयुक्त, कोकण भवन यांना पाठविले आहे.