मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिच्या बनावट ट्विटर खात्यावरून महापुरुषांची बदनामी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या विरोधात मनसेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
सोमवारी उर्वशी ठाकरे हिच्या ट्विटरवरील एक संदेश सोशल नेटवर्किग साईटवर फिरू लागल्याने खळबळ उडाली होती. त्यात तिने महापुरुषांविरोधात अवमानकार वक्तव्य केले होते. अमित ठाकरे याच्या नावानेही बनावट ट्विटर खाते उघडण्यात आल्याचे आढळून आले आहे.
राज ठाकरे तसेच उर्वशी ठाकरे आणि अमित ठाकरे यांची कुठल्याही प्रकारची ट्विटर खाती तसेच फेसबुक खाती नसल्याचे मनसे प्रवक्ते सचिन मोरे यांनी सांगितले. या प्रकरणी सोमवारी मनसेने सायबरसेल कडे तक्रार दाखल केली आहे. आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले.