गटनेतेपदाची घोषणा महापौरांनी टाळली

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठविलेल्या पत्राच्या आधारे पालिकेतील मनसेच्या गटनेतेपदी नगरसेवक संजय तुर्डे यांच्या नियुक्तीची घोषणा महापौर करतील अशी अपेक्षा होती. मात्र मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करुन शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांची पाठराखण करण्यासाठी महापौरांनी संजय तुर्डे यांची मनसेच्या गटनेतेपदावरील नियुक्तीची घोषणा करणे टाळले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तुर्डे यांची नियुक्ती करण्याचा आग्रह धरला होता. विश्वनाथ महाडेश्वर यांनी कसब पणाला लावून विरोधकांना सभाशास्त्राचे धडे देत मनसेच्या गटनेते पदाच्या घोषणेचा विषय टाळला.

मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या सहा नगरसेवकांना गट स्थापन करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र मनसेने कोकण आयुक्तांना सादर केले आहे. या पत्रावर अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले सहा नगरसेवक गुरुवारी पालिका सभागृहाच्या बैठकीस अनुपस्थित होते. पक्षात उरलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची पालिकेतील मनसेच्या गटनेतेपदी नियुक्ती करावी, असे पत्र राज ठाकरे यांनी पाठविले आहे. नियमानुसार राजकीय पक्षाकडून पत्र सादर झाल्यानंतर महापौर पालिका सभागृहात गटनेतेपदी संबंधित नगरसेवकाच्या नियुक्तीची घोषणा करतात. त्यानुसार गुरुवारी पालिका सभागृहात महौपार विश्वनाथ महाडेश्वर संजय तुर्डे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे घोषित करतील असे विरोधकांना वाटले होते. तुर्डेही सभागृहात नियुक्तीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत होते. स्थायी समितीमधील दोन सदस्यांची पदे रिक्त झाल्यामुळे त्यांच्या जागी संबंधित पक्षांनी सुचविलेल्या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. त्यानंतर संजय तुर्डे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची घोषणा महापौर करतील असे वाटत होते. परंतु त्यांनी सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेवरील प्रस्ताव पुकारण्यास सुरुवात केली. संजय तुर्डे यांनी महापौरांना राज ठाकरे यांच्या पत्राचे स्मरण करुन दिले. तसेच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीचे नगरसेवक संजय तुर्डे यांच्या नियुक्तीची घोषणा कधी  करणार अशी विचारणा महापौरांकडे करीत होते. मात्र विश्वनाथ महाडेश्वर यांनी टाळाटाळ करीत सभागृहाच्या पटलावरील पुढील कामकाज उरकण्यात गुंतले होते. अखेर काँग्रेस नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि संजय तुर्डे यांच्या पदरी निराशा पडली.

बैठक लांबणीवर

मनसेच्या गटनेते पदाची घोषणा करावी लागेल. यामुळे पालिका सभागृहाची गुरुवारची बैठक पुढे ढकलण्याची व्यूहरचना शिवसेनेकडून करण्यात येत होती. मात्र मनसेला घाबरून बैठक पुढे ढकलल्याची टीका होऊ नये म्हणून अखेर शिवसेनेने गुरुवारी सभागृहाची बैठक घेतली. या वेळी शिस्तीचा बडगा उगारत महापौरांनी विरोधकांना गप्प केले.