महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला ‘गुढीपाडवा मेळावा’ आज, शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. व्यासपीठ, बैठक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व वाहनतळांचे पर्याय, येणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय याकडे मनसेचे कार्यकर्ते जातीने लक्ष देत होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. मतदारांनी या पक्षावर त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला नाही. त्यातच मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप, शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्या नकारात्मक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. या निवडणुकीसाठी मनसेची भूमिका काय असणार, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्कवर सभांना परवानगी मिळाल्यानंतरचा हा मनसेचा पहिलाच मेळावा असल्याने यासाठी विशेष लक्ष देऊन तयारी करण्यात येत आहे. आपल्या सभांमधून वादग्रस्त विधाने व अजब सल्ले देणाऱ्या राज ठाकरे यांच्या रिक्षा जाळा आंदोलनाच्या हाकेनंतर या सभेत काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून सावरकर स्मारकाच्या समोरच्या बाजूस शिवतीर्थावर ३२ बाय ६० फुटाचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. व्यासपीठाच्या समोरून प्रकाश योजनेचे मनोरे असून डावी व उजवीकडे ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे.
सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीबाबत मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणेच संपूर्ण राज्यातून दीड लाखाहून अधिक कार्यकर्ते या सभेला गर्दी करणार असून या वर्षी आम्ही आमचाच उपस्थितीचा विक्रम मोडून काढू.