राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानांमध्ये सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत विक्री करण्यास मुभा दिली होती. त्यामुळे अनेक जण खरेदीच्या नावाने घराबाहेर पडून शहरात मुक्तसंचार करीत होते. त्यामुळे राज्य शासनाने ही दुकाने आता सकाळी 7 ते 11 यावेळेत खुली ठेवण्यास मुभा दिली असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालय अशा जीवनाश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांबाहेर नागरिकांची झुंबळ उडाल्याचे चित्र आहे.

सरकारने जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र याला व्यापारी व विरोधकांचा विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, “जीवनाश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 उघडी ठेवल्याने या 4 तासांत अशा सर्व दुकानांबाहेर गर्दी होत आहे. यापेक्षा ही दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू ठेवल्यास लोकांची विनाकारण गर्दी टाळता येईल. त्यामुळे सरकारने ग्राउंड लेवलची माहिती घेऊन ही वेळ त्वरीत वाढवावी.”

सरकारने प्रथम 4 एप्रिल रोजी शनिवार व रविवार लॉकडाउन जाहीर केले. त्यानंतर, राज्यातील बर्‍याच भागात रात्री संचारबंदी लावण्यात आली. राज्यात हे सर्व निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू होते. यानंतर, यामध्ये 15 दिवसांची वाढ करण्यात आली. आता 15 मे पर्यंत खासगी कार्यालये, चित्रपटगृहे आणि सलून असे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच करोनाच्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 891 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा आता 71 हजार 742 इतका झाला आहे. महाराष्ट्राचा एकूण मृत्यूदर आजच्या आकडेवारीनंतर 1.49 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.