गणवेश परिधान न केलेल्या तसेच बॅचदेखील नसलेल्या टॅक्सी चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी मनसे स्टाईल धडा शिकवला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी स्वत:च्या फेसबुक आकाऊंटवरदेखील शेअर केला.

‘रिक्षा-टॅक्सी चालकांनी कायद्याच्या चौकटीत राहून रिक्षा- टॅक्सी चालवावी. चालकांनी बिना परवाना, गाड्या चालवून दादागिरी दाखवू नये. जर सामान्य जनतेला तुमचा त्रास झाला तर जागेवरच फैसला केला जाईल.’ असं लिहित त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवड्यातला आहे. एअरपोर्ट परिसरात त्यांनी टॅक्सी चालकावर कारवाई केली आहे. ‘या भागात अनेक टॅक्सी चालकांची मनमानी चालते. हे चालक विनापरवाना या भागात टॅक्सी चालवतात असंही निदर्शनास आलं आहे. कित्येक टॅक्सी चालक गणवेश घालत नाही किंवा त्यांच्याजवळ बिल्लाही नसतो. म्हणून त्याच्याक्षणी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं’ अशी प्रतिक्रिया त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

‘जे टॅक्सी, रिक्षा चालक प्रवाशांकडून जास्त भाडे आकारतात त्यांना आम्ही चोप देतो. कारण वाहतूक पोलीस किंवा अधिकारी अशा मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करत नाही. जर त्यांनी कारवाई केली असती तर आम्हाला कायदा हातात घेण्याची गरजच भासली नसती. आम्ही कोणत्याही वर्गाच्या, समाजाच्या विरोधात नाही. पण, कायदे नियम पायदळी तुडवून जर रिक्षा, टॅक्सी चालक मुजोरी करत असतील तर मात्र मनसे स्टाईल धडा त्यांना शिकवण्यात येईल’ अशीही प्रतिक्रीया त्यांनी डीएनएला दिली.

या टॅक्सी चालकाला उठाबशा काढायला लावून नंतर त्याला सोडण्यात आलं. टॅक्सी रिक्षा चालकांवर कारवाई करत त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याची नितीन नांदगावकर यांची ही पहिलीच वेळ नाही याआधीही त्यांनी अनेक रिक्षा/टॅक्सी चालकांना धडा शिकवला होता.