10 August 2020

News Flash

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात ‘अफझल उद्धव’ भेट

अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर खास शैलीत भाष्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवे व्यंगचित्र समोर आले आहे. या व्यंगचित्राचा विषय आहे तो म्हणजे नुकतीच झालेली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट. या भेटीवरून शिवसेनेची मनधरणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता या विषयावर चांगलीच चर्चा रंगली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात भेटीचे वर्णन अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीसारखेच केलेले दिसून येते आहे.

‘अफझल खानाची फौज’ असा उपरोधिक उल्लेख शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केला होता. तोच धागा पकडत राज ठाकरे यांनी नवे व्यंगचित्र काढले आहे. या व्यंगचित्रात अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची भेट होताना दाखवली आहे. मात्र एकीकडे ही गळाभेट होत असताना दोघांच्याही हाती खंजीर दाखवला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या खिशात असलेले शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामेही व्यंगचित्रात स्पष्ट दिसून येत आहेत. भेट आणि मन की बात या मथळ्याखाली हे व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढले आहे. हे व्यंगचित्र राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

६ जून रोजी अमित शाह यांनी माधुरी दीक्षित यांची भेट घेतल्यावरही राज ठाकरेंनी बकेट लिस्ट नावाने एक व्यंगचित्र काढले होते. त्यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर त्यांनी व्यंगचित्र काढले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणांमधून अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफझल खानाशी केली होती. हाच संदर्भ उचलून राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र काढले आहे. अफझल खान आणि उद्धव ठाकरे यांची भेट त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवली आहे. व्यंगचित्रकार हा आपल्या शैलीतून डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींपलिकडे पाहतो, राज ठाकरेंसारखा निष्णात व्यंगचित्रकारही त्याला अपवाद नाही हे व्यंगचित्रही त्यांची अनोखी शैली व्यक्त करणारे आहे.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अमित शाह यांच्या शिष्टाईमुळे शिवसेना भूमिका बदलेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र शिवसेना स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपाकडून सेनेच्या मनधरणीचे आणखी प्रयत्न होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशात राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र नेटकरी चांगलेच पसंत करत आहेत असे दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2018 6:48 pm

Web Title: mns leader raj thackerays new cartoon on uddhav thackeray and amit shah meet
Next Stories
1 ‘राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलीस अपयशी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
2 VIDEO : डोंबिवलीच्या श्रुतिका महाजननं मिळवले 100 टक्के गुण
3 Maharashtra SSC 10th Result 2018: भावाचा अंत्यविधी करुन परीक्षा देणाऱ्या दीपालीला दहावीत ६८ टक्के गुण
Just Now!
X