महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आला आहे. तसंच संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिवाजी पार्क परिसरात दीपावलीनिमित्त मनसेकडून रोषणाई करण्यात आली होती. तसंच या परिसरात मनसेकडून कंदिलही लावण्यात आले होते. दीपावलीनिमित्त लावण्यात आलेले कंदील हटवण्यावरूनच संदीप देशपांडे यांचा सहाय्यक आयुक्तांसोबत वाद झाला. महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन संदीप देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून संदीप देशपांडे यांच्याविरोधात सहाय्यक आयुक्तांमार्फत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मनसेकडून दादर माहिम परिसरात दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारे कंदिल लावले होते. दरवर्षी या ठिकाणी मनसेकडून कंदिल लावण्यात येतात. तसंच ते तुळशीच्या लग्नानंतर काढलेही जातात. परंतु हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत पालिकेकडून कारवाई करण्यात आली. यावेळी संदीप देशपांडे यांनी त्यांना जाब विचारत शिवसेनेकडून लावण्यात येणारे कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का? असा सवाल पालिकेच्या अधिकाऱ्यांना केला. तसंच पक्षीय राजकारण सहन करणार नसून मनसेलाच लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर देशपांडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आलं.