महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर हवा, असं म्हणत संजय राऊत यांनी आज ‘रोखठोक’मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. या सादेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलेलं नाही. मात्र संदीप देशपांडे यांनी यावर त्यांचं मत मांडलं आहे. मी जे बोलतोय ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही तर ते माझं मत आहे. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर ते म्हणाले,   “महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?” असा प्रश्न विचारत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या रोखठोकमधील सादेला उत्तर दिलं आहे.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?
“मी जे मांडतो आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील. मला वैयक्तिक रित्या असं वाटतं की २००८ पासून जेव्हा महाराष्ट्रातील मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून मनसेचे प्रयत्न सुरु होते… तेव्हा शिवसेनेचे दिल्लीतले खासदार मूग गिळून गप्प होते. ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला अशी भूमिका पक्षाने आणि राज ठाकरेंनी घेतली तेव्हा शिवसेनेचे नेते गप्प होते. २०१४ आणि २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेला साद घातली तेव्हा शिवसेनेने आमच्यासोबत दगाफटका केला. रातोरात आमचे नगरसेवक पळवले. त्यामुळे जो प्रश्न कृष्णाने कर्णाला केला तोच प्रश्न आज मला विचारावासा वाटतो, जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा?”

‘रोखठोक’मध्ये काय संजय राऊत यांनी काय आवाहन केलं?

ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ हा लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी ठाकरे ब्रॅंडचा उल्लेख करत राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे.