शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. परंतु करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्याव्यात, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलं नाही. यावरून आता मनसेनं सरकारवर टीका केली आहे. “स्मारक की मातोश्री ३?” असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“महापौर बंगला घेऊन आता तीन वर्ष होत आली. परंतू हा बंगला अजूनही बंदीस्तच आहे. २३ जानेवारी आलं किंवा १७ नोव्हेंबर आलं तर निविदा काढल्यात, काम सुरू आहे इतक्याच बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. खरोखर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदीस्त का आहे. ते जनेसाठी का खुलं नाही? जनतेला त्या ठिकाणी का जाता येत नाही?, कोणाची खासगी मालमत्ता असल्यासारखं ते का वापरलं जातंय?,” असे सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

आणखी वाचा- बाळासाहेबांची आठवण काढत फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले…

“सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनातील जो प्रश्न आहे तोच आम्ही आज उपस्थित करत आहोत. ती कोणाची खासगी मालमत्ता नाही. ती स्मारकासाठी दिलेली जागा आहे. ती जागा चारही बाजूंनी बंदिस्त का केलीये?, जनतेला आत का जाऊ दिलं जात नाही याची उत्तरं मिळाली पाहिजे,” असंही देशपांडे म्हणाले. शिवसेनाप्रमुख हे सर्व जनतेचे आहेत तर स्मारक जनतेचं का नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.