करोना काळातील वीजबिलांच्या माफीबाबत सध्या आंदोलने करण्यात येत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपानंतर आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात वीजबिलाविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक ठिकाणी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. तरीही मनसेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. याचसंदर्भात प्रश्न विचारला असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा ठेका काय फक्त आम्ही घेतला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी असे फलक हाती घेऊन राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले. या मोर्चांमध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे, पुण्यासहीत काही ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. याचसंदर्भात करोना काळात आंदोलनादरम्यान होणाऱ्या गर्दीवरुन संदीप देशापांडेना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा ठेका फक्त मनसेने घेतलेला नाही असं म्हटलं आहे. “कायदा सुव्यवस्थेचा ठेका फक्त आम्हीच घेतलाय का? सरकारनेही विचार करावा कायदा सुव्यवस्थेचा. हे वाटेल तसे वागणार आणि आम्ही कायदा सुव्यवस्था बघणार असं नाही चालणार,” अशा शब्दांमध्ये देशपांडे यांनी सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला.

आणखी वाचा- हा तर ठाकरे सरकारचा जिझिया कर; वीजबिलांवरून राज ठाकरे कडाडले

महाराष्ट्र सरकारने वीज बिलं कमी करण्यासंदर्भात प्रयत्न केल्याचा दावा केला असून वीज कंपन्यांना ते परवडत नसल्याचं म्हटलं आहे. याचवरुन प्रश्न विचारला असता देशपांडे यांनी सरकारचे प्रयत्न कुठेच दिसत नसल्याची टीका केली. “सरकारचे प्रयत्न कुठे दिसले? तुमचे ऊर्जा मंत्रीच म्हणाले होते की आम्ही दिसाला देऊ. गोड बातमी देऊ. मग माशी कुठे शिंकली हे जनतेला सरकारने सांगावं,” अशी मागणी देशपांडे यांनी केली.