महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा मराठी पाटय़ांचे आंदोलन हाती घेत कांदिवली, चारकोप येथील एका कोचिंग क्लासच्या इंग्रजी पाटय़ांवर दगडफेक केली. बुधवारी सकाळी झालेल्या या दगडफेकीप्रकरणी चारकोप पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
दुकानांवर मराठी पाटय़ांची सक्ती असावी, ही मागणी घेऊन मनसेने काही वर्षांपूर्वी आंदोलन हाती घेतले होते. मुंबईतील अनेक दुकानांनी लावलेल्या इंग्रजी पाटय़ांना लक्ष्य करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. बुधवारी सकाळी अचानक चारकोप भागातील एका कोचिंग क्लासच्या इंग्रजी भाषेतील पाटय़ांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. तसेच क्लासचे फलकही फाडले, अवघ्या काही मिनिटांत ही दगडफेक करून कार्यकर्त्यांनी पळ काढला होता. चारकोप पोलिसांनी कारवाई करत विलास खैर, विश्वास मोरे आणि रोहन कुळेकर यांना अटक केली. क्लासने मराठीत पाटय़ा लावाव्या असे वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन केल्याचे मनसेतर्फे सांगण्यात येत आहे.
तीनही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दगडफेक करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांचा शोध चारकोप पोलीस घेत आहेत.