राज्यात सध्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) सुरु असलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख यांच्यापासून ते अजित पवार आणि खडसेंच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून कारवाई सुरु असल्याने ठाकरे सरकारकडून भाजपावर जोरदार टीका सुरु आहे. ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावलं जात असताना मनसे आमदार राजू पाटील बुधवारी ईडी कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. दोन तासांनी ईडी कार्यालयातून ते बाहेर पडले. पण राजू पाटील ईडी कार्यालयात नेमक्या कोणत्या प्रकरण किंवा कारणासाठी उपस्थित होते हे समजू शकलेलं नाही.राजू पाटील यांना कोणत्याही प्रकारचा समन्स न बजावता ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजू पाटील ईडीच्या झोन-२च्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता राजू पाटील यांनी काहीच उत्तर दिलं नाही. समन्ससंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर देणं टाळलं. त्यामुळे राजू पाटील नेमके कशासाठी ईडी कार्यालयात गेले होते यासंबंधी चर्चा रंगली आहे.