22 November 2017

News Flash

मनसे-राष्ट्रवादी वाद रस्त्यावर!

राज्यातील दुष्काळी स्थिती आणि ‘काकामुळे मिळालेले मोठेपण’ या मुद्दय़ांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 28, 2013 3:36 AM

राज्यातील दुष्काळी स्थिती आणि ‘काकामुळे मिळालेले मोठेपण’ या मुद्दय़ांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरू झालेला शाब्दिक संघर्ष मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर आल्याने, दुष्काळात होरपळणाऱ्या जिल्ह्यांत तणाव निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या गाडीवर नगरजवळ झालेल्या दगडफेकीनंतर बुधवारी मनसेचे संतप्त कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. जाळपोळ, दगडफेक, मारामाऱ्या आणि आरोप- प्रत्यारोपांमुळे मनसे-राष्ट्रवादीतील संघर्ष तीव्र झाला असून, आगामी निवडणुकीतील थेट राजकीय सत्तास्पर्धेचे रंग आतापासूनच राज्यात उमटू लागले आहेत.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवरच नेम साधला. राज ठाकरे यांच्या गाडीवरील दगडफेकीच्या बातम्या बुधवारी पसरताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ते रोखले. मुंबईत चेंबूर, कुर्ला, वांद्रे भागात काही ठिकाणी किरकोळ दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. काही वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. मुंबई, ठाणे जिल्ह्यांत व राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले झाले, काही ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमा जाळल्या गेल्या. या आक्रमक पवित्र्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या गोटातूनही मनसेवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात असभ्य भाषेला थारा नाही, अशा कृतीला राजकीय विचारांनी प्रत्युत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता व संयम पाळावा अशा आवाहनाचे पत्रक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी जारी केले असतानाच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र मनसेवर जोरदार हल्ला चढविला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही पोलीस गय करणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही पोलिसांना घाबरत नाही असे प्रत्युत्तर देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला ठणकावले. मनसेचे आमदार राम कदम यांनी तर, ‘राज ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ,’ अशा भाषेत राष्ट्रवादीला थेट आव्हानच दिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरावयाचे आहे आणि त्यांची घरे मुंबईतच आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. कदम यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटण्याच्या शक्यतेने पोलिसांनी त्यांना घाटकोपर येथे अटक करून नंतर त्यांची मुक्तता केली. तोडफोड, जाळपोळीच्या आरोपावरून पोलिसांनी मुंबईत सुमारे २२ जणांना अटक केल्याचे सांगण्यात आले.
उद्धव ठाकरेंकडून
मनसेचे समर्थन
मंगळवारपासून सुरू झालेल्या मनसे-राष्ट्रवादीतील या संघर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा राज यांच्या समर्थनासाठी सरसावले. राज ठाकरेंच्या पक्षाशी आमचे मतभेद असले, तरी सत्ताधारी पक्षाकडून होणाऱ्या त्रुटींवर बोट ठेवणे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कर्तव्यच असते. राज ठाकरे यांनी ते बजावले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीत राज यांची पाठराखण केली. असे केल्याबद्दल जर दगडफेकीसारखे प्रकार होत असतील, तर पोलिसांना काही वेळ बाजूला व्हावे, म्हणजे आम्ही हल्लेखोरांचा योग्य समाचार घेऊ, असेही उद्धव यांनी बजावले.
मुख्यमंत्री सतर्क
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये उफाळलेल्या संघर्षांमुळे राज्यात अशांतता पसरू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना दिल्या आहेत. संध्याकाळी अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्यासमवेत विधानभवनात तातडीची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली.
बातम्यांमुळे प्रक्षोभ
नगर जिल्हा व शहरात बुधवारी शांतता होती. येथील दगडफेकीच्या प्रकाराचे माध्यमांमधून, त्यातही दूरचित्र वाहिन्यांमधून यासंदर्भात विपर्यस्त वृत्त दिल्याने प्रक्षोभाचे वातावरण तयार झाले, मोठा हिंसाचार घडल्याचे चित्र त्यातून तयार झाले, अशी चर्चा  होती.
विकतची जाळपोळ :  कुर्ला येथे भंगारमधून आणलेली जुनी मारूती गाडी पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली. याप्रकरणी मुस्तकीम, अब्दुल हारून, शान इलाही, आसिफ अली या मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

First Published on February 28, 2013 3:36 am

Web Title: mns ncp controversy came on road
टॅग Controversy,Mns Ncp