मराठी सिनेमांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जर मराठीत डब करण्यात आला तर गाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे असा इशाराच मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ट्विट करत ‘मिशन मंगल’ सिनेमा मराठीत डब करण्यास तीव्र  विरोध केला आहे.

काय म्हटलं आहे शालिनी ठाकरे यांनी?

मराठी चित्रपटसृष्टीचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वचनबद्ध आहे. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा एकाच वेळी मराठी आणि हिंदीत चित्रीत करण्यात आला असता तर त्याच्या प्रदर्शनाला आम्ही विरोध दर्शवला नसता, हे चित्रपटाशी संबंधित सगळ्या लोकांनी ध्यानात घ्यावे. मराठी सिनेमांवर अन्याय होऊ नये यासाठी आजवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने आजवर बॉलिवूडच्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. मात्र दरवेळी ते पुन्हा तीच चूक करतात.

‘मिशन मंगल’ हा सिनेमा मराठीत डब करुन महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीचं दुहेरी नुकसान होणार आहे. मराठी सिनेमासाठीच्या खेळाच्या वेळा हा डब सिनेमा लाटणार आहे. त्यामुळे मराठी सिनेमांना प्राईमटाईमचे शो मिळणार नाहीत. दुसरीकडे मराठी कलावंत-अभिनेते यांच्याशिवाय एखादा सिनेमा मराठीत प्रदर्शित करुन पैसे कमावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. असे झाल्यास मराठी सिनेसृष्टीचे नुकसानच होईल. याच अनुषंगाने आम्ही हा सिनेमा डब करण्यास विरोध दर्शवला आहे असे मनसेने म्हटले आहे.

हल्ली काहीजण एकच सिनेमा एकाचवेळी दोन भाषांमध्ये चित्रित करतात. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जर एकाचवेळी हिंदी आणि मराठीत शूट झाला असता, तर त्याच्या प्रदर्शनाला आम्ही निश्चितच विरोध केला नसता, हे या चित्रपटाशी संबंधित लोकांनी ध्यानात घ्यावे. प्रेक्षकांना चांगले सिनेमे पाहायला मिळायला हवेत, ही आमची भूमिका आहेच; मात्र एखाद्या विशिष्ट भाषिक इंडस्ट्रीचा अपमान आणि नुकसान करण्याचा हक्क कुणालाही नाही. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा मराठीत डब करून प्रदर्शित करण्याची हिंमत संबंधितांनी दाखवू नये, अन्यथा गाठ  राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे! असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.