गुजराती समाजाला ‘सामना’तून समज देताना हात पोळलेल्या शिवसेनेची त्याच विषयावरून शुक्रवारी ‘मनसे’ने कोंडी केली. मुंबईचा आर्थिक व बौद्धिक विकास गुजराती समाजामुळे झाला, असा दावा करणाऱ्या एका गुजराती दैनिकाच्या जाहिराती सध्या बेस्ट बसवर झळकत आहेत. त्या जाहिराती तातडीने काढून टाकाव्यात, अशी मागणी मनसेने बेस्ट समितीच्या बैठकीत केली. या जाहिराती बेस्टने मागे न घेतल्यास त्या काढण्यासाठी मनसे ‘तयार’ आहे, असा इशाराही या वेळी देण्यात आला. एकीकडे नमो नमोचा जप करणाऱ्या मनसेने अचानक घेतलेल्या या पवित्र्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची मात्र चांगलीच पंचाईत झाली.
 बेस्ट बस तसेच अनेक रेल्वे स्थानकांवर सध्या ‘संदेश’ या गुजराती वर्तमानपत्राची जाहिरात झळकत आहे. ‘मुंबईची आर्थिक प्रगती, बौद्धिक विकास कोणामुळे? आपल्या गुजरातींमुळे. गुजराती समाजाचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी मुंबईत ‘संदेश’ हवा,’ या अर्थाची जाहिरात गुजराती भाषेतून शंभरहून अधिक बसवर एप्रिलपासून लावण्यात आली आहे. वडाळा, सांताक्रूझ, गोराई, पोयसर, दिंडोशी, मुलुंड, घाटकोपर, मागाठणे या बस आगारातील प्रत्येकी दहा तर मालवणी, मजास, मरोळ, ओशिवरा, गोरेगाव व मुंबई सेंट्रल येथील प्रत्येकी सहा बसवर ही जाहिरात लावण्यात आली आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आक्षेप घेतला.
मुंबईच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग नाही का? किलरेस्कर, टाटा यांच्यापासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेकांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला. केवळ गुजराती समाजच मुंबईचा आर्थिक विकास करीत आहे, असे म्हणणे मराठी माणसांवर अन्याय करणारे नाही का, असे प्रश्न विचारत या जाहिराती ताबडतोब काढून टाकण्याची मागणी देशपांडे
यांनी केली.
मुंबईच्या बौद्धिक विकासाचे सारे श्रेयही गुजराती समाजाला देणे हे मराठी व गुजराती समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे. अशी तेढ निर्माण होण्याआधी त्यावर कारवाई केली गेली पाहिजे. बसव्यतिरिक्त इतर ठिकाणी लागलेल्या जाहिराती हटवण्यासाठी संबंधित संस्थांनी पावले उचलली पाहिजेत. पण बेस्ट प्रशासनाने आधी आपल्या बसवरील जाहिराती काढायला हव्यात, अशी मागणी मनसेचे बेस्ट समितीतील सदस्य केदार होंबाळकर यांनी केली.

मनसेकडून हा मुद्दा मांडला जात असताना बैठकीत असलेल्या शिवसेना-भाजपच्या सदस्यांमध्ये मात्र शांतता पसरली होती. बेस्टचे अध्यक्ष असलेले सेना नगरसेवक अनिल दुधवडकर यांनी या मुद्दय़ात तथ्य नसल्याचे हळू आवाजात सांगितले. ‘बेस्ट प्रशासन या जाहिराती काढणार नसेल तर तसे सांगा, मनसे त्यांच्या पद्धतीने बेस्ट बसवरील जाहिराती काढेल,’ असा आवाज संदीप देशपांडे यांनी दिल्यावर मात्र महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी या जाहिरातींवर तातडीने कारवाई होईल, असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी अध्यक्षांकडे पाहत, शब्द फिरवत ‘योग्य ती कारवाई’ करण्याचे आश्वासन दिले.