प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी यांना ‘पद्मश्री’ हा किताब जाहीर केला आहे. मात्र, अदनान सामी यांच्या पद्मश्रीला शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध दर्शवला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. मात्र, त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना लगेच पद्मश्रीने कसे काय गौरविण्यात येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये खोपकर म्हणतात, मोदी सरकारने अदनान सामी यांना दिलेला पुरस्कार परत घ्यावा. तसेच आपली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण याचा विरोध करीत राहणार असे त्यांनी म्हटले आहे.