मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विरूद्ध परप्रांतीय राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( मनसे) कार्यकर्त्यांनी एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक विरूद्ध परप्रांतीय राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरात हा सर्व प्रकार घडला. यावेळी मनसेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय फळविक्रेत्याला शिवीगाळ करत त्याला मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या मारहाणीमागचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी या प्रकरणाला राजकारणाची किनार असण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी या मारहाणीचे समर्थन केले आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. थेट मुंबईत येऊन भाजीपाला आणि फळे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना परप्रांतीयांकडून आडकाठी केली जात आहे. त्यामुळे परप्रांतियांच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेकडे वारंवार दाद मागूनही परप्रांतीय फेरीवाले आणि विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आमच्याकडे रस्त्यावरून उतरून कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मात्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशाप्रकारची मारहाण योग्य नसून कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. भारतात प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे कोणीही अशाप्रकारे इतरांना मारहाण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यांच्याविरोधात कडक पावले उचलली जातील, असे आशिष शेलार यांनी सांगितले.