मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्ते शांतपणे ईडी कार्यालयात जाणार आहेत अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सामान्य माणसांना, नोकरदार वर्गाला त्रास होता कामा नये ही आमची भूमिका आहे. २२ ऑगस्टला आम्ही सगळे ईडी कार्यालयात जाणार मात्र आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. २२ ऑगस्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयासमोर हजर राहणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही असणार आहेत. मनसेचं शक्तीप्रदर्शन यावेळी केलं जाईल मात्र सामान्य माणसांना, नोकरदार वर्गाला त्रास होऊ नये असे आमचे आवाहन आहे. नेमके किती समर्थक येतील याचा अंदाज नाही असेही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेकडून २२ तारखेला ठाणे बंदची हाक देण्यात आली. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आल्याचं काल काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं होतं. मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. २२ ऑगस्ट ला आम्ही शांतपणे राज ठाकरेंसोबत जाणार आहोत असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.