21 February 2019

News Flash

राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेशोत्सवावरुन सुरु असलेल्या वादावर पोस्टरबाजी करत शिवेसनेवर हल्लाबोल केला आहे

मुंबई महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेशोत्सवावरुन सुरु असलेल्या वादावर पोस्टरबाजी करत शिवेसनेवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा असा टोला मनसेने मारला आहे. शिवसेना भवनसमोर हे पोस्टर लावण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्यासंबंधी वक्तव्य केलं होतं.

दरम्यान याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा सवाल विचारत गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करावा असं सांगितलं होतं.

सण, उत्सवादरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका: मुंबई हायकोर्ट

गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली ६० ते ७० वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आली, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो. त्यासाठी का आडकाठी केली जाते असा प्रश्न विचारत राज ठाकरे पुढे म्हणाले होते की, मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन राज यांनी गणेशोत्सव मंडळांना केले होते.

गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जावे – उद्धव ठाकरे
गणेशोत्सव हा धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे. ज्यांना गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जाऊन बसावे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केले. ध्वनी प्रदुषणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन गणेशोत्सवात विघ्न आणणाऱ्यांना मेट्रोच्या कामांमुळे होत असलेला खणखणाट ऐकून येत नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला.

विघ्नहर्त्या मंगलमूर्तीचे आगमन होण्यापूर्वीच विघ्नकर्त्या कायदे पंडिताचे सोटे वाजतात. आनंदाच्या वेळेला ही लोक काळ्या मांजरासारखे आडवे येतात. शांतता गेली स्मशानात. गणेशोत्सव हा धूमधडाक्यातच साजरा झाला पाहिजे. ज्यांना गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल १० दिवस स्मशानात जाऊन बसावे, असे त्यांनी सांगितले.

First Published on August 10, 2018 11:07 am

Web Title: mns poster on shivsena built ganpati pandal first before ram temple