मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन रेल्वे स्टेशनच्या परिसरात पुन्हा बसू लागणाऱ्या फेरीवाल्यांची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता लगेचच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रभागातल्या फेरीवाल्यांना मनसे हाकलून दिलं. यावेळी मनसे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे आणि शाखाध्यक्ष संदेश गायकवाड यांचा वाकोला पोलीस अधिकाऱ्यांशी वादही झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या निर्णयला विरोध दर्शवला होता.

त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा प्रश्नही त्यांनी मांडला. मनसेने आंदोलन केल्यावर काही दिवस सगळे ठीक चालले आता पुन्हा फेरीवाले बसू लागले आहेत आणि महापालिकेचे लाचखाऊ अधिकारी त्यांना बसू देत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. या आरोपानंतर सांताक्रुझमध्ये मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहण्यास मिळाले.

राज ठाकरेंनी घेतलेल्या भेटीनंतर मनसैनिकांचं फेरीवाल्यांविरोधातलं आंदोलन पुन्हा सुरु झाल्याचं मुंबईत पाहायला मिळालं. यावेळी मनसेनं मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या वॉर्डमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. रेल्वे स्टेशनपासून दीडशे मीटर अंतरापर्यंत फेरीवाले नकोत हा कोर्टाचा आदेश ऐकूनही का ऐकला जात नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्यानंतर आजच मुंबईत मनसेचे आंदोलन सुरु झाल्याचे पाहण्यास मिळाले.