महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी विदर्भवाद्यांकडून आयोजित करण्यात आलेली पत्रकारपरिषद उधळून लावली. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणाऱ्या अॅडव्होकेट वामनराव चटप आणि डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यातर्फे या पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकारपरिषद सुरू असताना मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वाखालील मनसेचे कार्यकर्ते सभागृहात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी सभागृहात दाखल होत अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. या सर्व गोंधळामुळे पत्रकारपरिषद बंद पडली. हा महाराष्ट्र अखंड राहावा ही सर्व मराठी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांची पत्रकार परिषद उधळण्यात काहीही गैर नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.  दरम्यान, मनसेच्या राड्यानंतर काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.
यापूर्वी गुढीपाडवा मेळाव्यात स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या श्रीहरी अणे यांच्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. अणेंसारख्या लोकांना महाराष्ट्राचे तुकडे करायला तो वाढदिवसाचा केक वाटला काय, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला होता. श्रीहरी अणे यांना हा दिवस कायमचा लक्षात राहील, असा धमकीवजा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता.