दादर-माटुंगा दरम्यान आज प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेलरोको करत आंदोलन केले. मुंबईकरांना ऐन घाईच्या वेळी वेठीस धरण्यात आल्याने त्यांची दैनंदिन कामे खोळंबली. या सगळ्या प्रकाराला रेल्वे मंत्री पियुष गोयल जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून शिवसेना आणि मनसेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान पियुष गोयल आणि सेना खासदारांमध्ये नुकतीच या विषयावरुन बैठक घेण्यात आली. त्यावेळी गोयल यांनी मनसेवर निशाणा साधला. ‘मनसे फसली असून खड्ड्यात गेली, असल्याचे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. आता गोयल यांच्या या वक्तव्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘एबीपी माझा’ ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मराठी बेरोजगारांना रोजगार मिळायलाच हवा असे सेना आणि मनसेचे म्हणणे असल्याने त्यांनी रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहे असे आश्वासन दिले होते. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आपण स्वत: या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रिय स्तरावर रेल्वे भरती संदर्भातील मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मनसेचे नेते ठराविक विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत जातील. त्याठिकाणी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन या विषयाचा तडा लावणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते.