दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शुक्रवारी पहिला ‘गुढीपाडवा मेळावा’ झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप, मोदी आणि शहा यांच्यावर चौफेर टीका केली. राज्याचे तुकडे करण्याची भाषा करणाऱयांनो तुकडे करून वाटून घ्यायला महाराष्ट्र म्हणजे केक वाटला का? असा खोचक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला. विदर्भातील अनेक नेते आज केंद्रात आणि राज्यात मंत्री आहेत. मग सत्ता हातात असूनही विदर्भाची प्रगती होत नसेल तर त्यात महाराष्ट्राचा दोष काय? झेपत नसेल तर सत्ता सोडा पण महाराष्ट्राचे तुकडे करु देणार नाही, असा एल्गार राज यांनी यावेळी केला. तासाभराच्या भाषणात राज यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही
मी हाती घेतलेली आंदोलने अर्धवट सोडली गेली, असा आरोप प्रत्येकवेळी केला गेला. पण अर्धवट सोडलेले एकतरी आंदोलन मला दाखवून द्यावे. मी आजवर जी आंदोलनं केली ती पूर्ण केली, असे ठाम मत राज यांनी सभेत व्यक्त केले. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आंदोलन असो वा टोलचे मनसेने केलेली आंदोलने पूर्णपणे यशस्वी झाली. टोलविरोधातल्या आंदोलनामुळे आज सरकारला राज्यातील सर्व अनधिकृत टोल बंद करावे लागले, हे आंदोलनाचे यश नाही का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

अमित शहा सुटले, मग राम मंदिर कोर्टात का अडकले?
राम मंदिराबाबत कोर्टात अद्याप केस सुरू आहे. ज्या राम मंदिराचे स्वप्न दाखवून मोदी सत्तेत आले. मग राम मंदिराचं काय झालं? याला अर्धवट आंदोलन सोडणे असे म्हणतात, असा टोला राज यांनी लगावला. राम मंदिराचा विषय निघाला की कोर्टात केस सुरू असल्याचे उत्तर दिले जाते. मग अमित शहा जर कोर्टातून सुटू शकतात, तर राम मंदिरचा प्रश्न अजूनही कोर्टात का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

सत्तेत असूनही शिवसेना आम्हाला घाबरते
शिवाजी पार्कवर सभा घेणार हे माहित झाल्यानंतर सेनेला पोटशूळ झाला. राज्यात सत्ता यांची तरीही हे आम्हाला घाबरतात. पटत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, असे राज म्हणाले

‘भारत माता की जय’चा वाद मुद्दाम उकरून काढला
देश प्रेमाची प्रमाणपत्र काय फक्त संघ वाटणार का? ‘भारत माता की जय’ घोषणा इंदिरा गांधींच्या काळापासून मी ऐकत आलो आहे. इंदिरा गांधी त्यांचे भाषण संपल्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा देत असत. भारत माता की जय ही घोषणा काही रोज दिली जात नाही. त्यामुळे हा वाद मुद्दाम उकरून काढला गेला, असा आरोप राज यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेवरून सुरू झालेल्या वादाबाबत केलेल्या वक्तव्यावरही राज बरसले. तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून कोण काढतयं? असा सवाल करत राज यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांची नक्कल करत देवेंद्र फडणवीस म्हणजे वर्गातील मॉनिटर असल्याचे म्हटले.

जे काँग्रेसच्या राज्यात, तेच मोदींच्या राज्यात
काँग्रेस सरकारच्या काळात देशात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती मोदींच्या राज्यातही आले. उलट त्याहून परिस्थिती आणखी खालावत चालली आहे. मोदींकडून लोकांना खूप आशा होत्या. पण पंतप्रधान झाल्यानंतर नुसत्या घोषणांचा पाऊस आणि जनतेच्या हातात मात्र काहीच पडत नसेल, तर ती सत्ता काय कामाची? आजही राज्यासह देशात शेतकऱयांच्या आत्महत्या होतच असतील मग त्यांच्यात आणि यांच्यात फरक तो काय? असा सवाल राज यांनी सत्ताधाऱयांना विचारला.

LIVE UPDATES: