महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनसेतर्फ ९ फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शॅडो कॅबिनेट, सीएए मुद्द्यांवर चर्चा होणार होती. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती. पण १० मिनिटांतच राज ठाकरे बैठकीतून निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, थ्रोट इन्फेक्शन झालं असल्याने तसंच डॉक्टरांकडे जायचं असल्याने राज ठाकरे लवकर बैठकीतून निघून गेले. जाण्याआधी त्यांनी पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या. तसंच ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर सर्व तयारी करण्याचा आदेश दिला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशा सूचना केल्या. पक्षाचं पहिलं महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सूचना केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला जातो.