गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आता आधीच्या तुलनेत त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे. लतादीदी लवकरात लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लतादीदींसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लतादीदींची भेट घेतली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदी आहेत.


“दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतो”, अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.


दरम्यान,  लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्या औषधोपचांराना योग्य प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.