News Flash

मनसेमुळे बंद झाली मुंबईतील ‘कराची बेकरी’? बेकरीचे मॅनेजर म्हणतात….

मुंबईतील प्रसिद्ध 'कराची बेकरी' अखेर बंद

मुंबईतील प्रसिद्ध कराची बेकरी अखेर बंद झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी कराची बेकरीच्या मालकांना कायदेशीर नोटीस पाठवून कराची नाव हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता कराची बेकरी बंद झाल्यावर याचं श्रेय घेण्याचा शेख यांनी प्रयत्न केला आहे.

“कराची बेकरी नावातील कराची हे नाव हटवण्यासाठी कराची बेकरीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामुळे अखेर मुंबईतील कराची बेकरीचं एकमेव दुकान बंद करण्यात आलं आहे.” असं शेख यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. मात्र नेटकऱ्यांना काही शेख यांचा दावा पटलेला नाही. एक मार्च रोजी शेख यांनी ट्विट करुन कराची नाव हटवण्यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर अखेर मुंबईतील कराची बेकरीचं एकमेव दुकान बंद झालं असं ट्विट केलं होतं. त्यावर मुंबई नॉर्थ सेंट्रेल डिस्ट्रीक्ट फॉरमच्या नावे असलेल्या ट्विटर हँडलने शेख यांचा दावा पूर्णतः फेटाळला. शिवाय कराची बेकरीचे व्यवस्थापक रामेश्वर वाघमारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.


“कराची बेकरीने व्यवसाय कमी झाल्यामुळे आपलं दुकान बंद केलं आहे, हाजी सैफ शेख यांच्या मागणीमुळे नव्हे चुकीची माहिती पसरवली जातेय…लोकांची दिशाभूल करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे” असं ट्विट केलं आहे. याशिवाय अन्य अनेक नेटकऱ्यांनीही व्यवसायात मंदी आल्यामुळे कराची बेकरी बंद करण्यात आली, त्याचा मनसेच्या आंदोलनाशी संबंध नाही असं सांगितलं. तसेच, ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बेकरीचे व्यवस्थापक रामेश्वर वाघमारे यांनी दुकान मनसेच्या इशाऱ्यामुळे बंद केलेलं नाही, असं म्हटलं आहे. “दुकानाचा भाडे करार संपल्यामुळे दुकान बंद केलं आहे. कारण जागेचे मालक जास्त भाडे मागत होते. लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद असल्यानं जास्तीचं भाडं देणं शक्य नाही,” असं वाघमारे यांनी सांगितलं.

दरम्यान, नोव्हेंबर २०२० मध्ये मनसेनं कराची बेकरीच्या नावाला विरोध करत नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यात चर्चेत आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 11:15 am

Web Title: mns raj thackeray party tries to takes credit of closing karachi bakery sas 89
Next Stories
1 साहित्यप्रेमींच्या सेवेसाठी ‘किताबखाना’ पुन्हा सज्ज
2 रेल्वेतील गर्दी नियंत्रणाचा फज्जा
3 खासगी रुग्णालयांमध्येही नोंदणीची सुविधा
Just Now!
X