News Flash

“तो बंडखोरीचा काळ होता…”, राज ठाकरेंनी जागवल्या ऋषी कपूर यांच्या आठवणी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण ऋषी कपूर यांना आदरांजली वाहत असून शोक व्यक्त करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या असून एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं ! असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करताना एक पत्र शेअर केलं आहे.

पत्रात काय लिहिलं आहे –

यश-अपय़शाच्या चौकटी मोडून जे स्वत:ला आवडेल, योग्य वाटेल तसं वागणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट माध्यमावर कमालीचं प्रेम असणारे दोन नट एकामागोमाग हे जग सोडून गेले यासारखी दु:खाची बाब नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला वहिला चॉकलेट बॉय म्हणजे ऋषी कपूर. १९७३ साली बॉबी चित्रपटातून ऋषी कपूर यांनी पदार्पण केलं. तो काळ बंडखोरीचा काळ होता. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, मर्दानी देखणा विनोद खन्ना, रसिकांना घायाळ करण्याची अदाकारी असलेला राजेश खन्ना, दमदार संवादफेकीचं कौशल्य लाभलेला शत्रुघ्न सिन्हा, बलदंड धर्मेंद्रजी आणि चतुरस्त्र संजीव कुमार यांचा तो काळ होता. या झंझावातात ऋषी कपूर यांनी पदार्पण केलं. स्वप्नाळू पण बंडखोर तरुणाईचे नायक म्हणून त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आणि टिकवलं.

ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटात त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या आणि तेव्हाच्या सुपरस्टारसोबत काम केलं. पण कॅमेऱ्यासमोरचा सहज वावराचा कपूर घराण्याचा वारसा त्यांच्याकडे आला होता. त्यामुळे ते कधीच कुठल्यात सिनेमात दुय्यम वाटले नाहीत. त्यांचा अभिनय इतका सहज असे की असं वाटायचं की जणू काही त्यांच्यासमोर कॅमेऱ्याच नाहीये. रंगभूमीवरील अभिनेत्याची ताकद  आणि चित्रपट माध्यमात आवश्यक असलेली सहजता यांचा सुरेख संगम त्यांच्या अभिनयात आढळत असे. त्यामुळेच समकालीन दिग्गजांच्या स्पर्धेतही ते स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करुन स्वत:चे चित्रपट स्वबळावर यशस्वी करु शकले. २००० च्या आसपास आधीच्या पिढीतील अभिनेते हळूहळू मागे पडत होते पण ऋषी कपूर टिकून राहिले. विनोदी भूमिका करताना त्यांनी कधी अंगविक्षेप केले नाहीत आणि चरित्र भूमिका करताना कधी अतीनाट्यमयता येऊ दिली नाही. त्यांचं सिनेमावरचं प्रेम तितकंच अबाधित राहिलं. आणि त्यामुळे २०२० मधील एखाद्या तिशीतल्या नवोदित लेखकालासुद्धा सिनेमा लिहिताना ऋषीजीच डोळ्यासमोर दिसत राहिले.

ऋषी कपूर यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता आणि अर्थात त्यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होता. सामाजिक, राजकीय आणि व्यवसायाशी संबंधित घडामोडींबाबत ते अतिशय मोकळेपणाने आणि समर्पक शब्दांत व्यक्त होत. त्यांचा स्वभाव त्यांच्या ट्विटसमधून दिसायचा. जे मनात तेच ओठावर आणि तेच ट्विटरवर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ट्विटवर कितीही वादंग माजला तरी ते मागे हटायचे नाहीत. तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत.

चित्रपट कलेवर कमालीचं प्रेम असणारा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अफाट ताकदीचा अभिनेत्याचं भारतीय चित्रपसृष्टीतील स्थान अढळ राहील. ऋषी कपूर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 2:17 pm

Web Title: mns raj thackeray pays tribute to bollywood actor rishi kapoor sgy 87
टॅग : Rishi Kapoor
Next Stories
1 चिंटू हे नाव कसं पडलं?; ऋषी कपूर यांनी सांगितला होता किस्सा
2 जेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल
3 “तुमच्यासारखा कलावंत कधीच मरत नाही”; सुबोध भावेने व्यक्त केले दु:ख
Just Now!
X